Maharashtra Politics : सत्तासंघर्षाचा निकाल थोड्याच वेळात; पाहा कोणाचं पारडं जड
राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो.. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरु झाल्यात.. अचानक या चर्चांना उधाण का आलंय.
Maharashtra Politics : कोणत्याही क्षणी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) राहणार की जाणार की राहणार याचा सुप्रीम फैसला होऊ शकतो. मात्र त्याचदरम्यान घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Constitutionalist Ulhas Bapat) यांच्या एका शक्यतेनं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) स्टेटसको अँटी म्हणजेच पूर्व परिस्थिती कायम ठेवण्याचा निकाल दिला तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात, असं मत उल्हास बापटांनी व्यक्त केलंय. बापटांच्या तर्कानुसार..
ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?
राज्यपाल राज्यघटनेच्या विसंवादी वागले तसंच राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता अधिवेशन बोलावले. त्यानंतर बहुमत सिद्ध होण्याबाबत साशंकता असल्यानं उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. राज्यपालांची कृती घटनाबाह्य ठरवून सुप्रीम कोर्ट स्टेटस क्वो अँटी आदेश देऊ शकतात. तसं घडलं तर पूर्व परिस्थिती कायम ठेवावी लागेल. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद कायम राहू शकतं.
शिंदेंचं काय होणार?
एकीकडे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील अशी शक्यता वर्तवली जात असताना शिंदेंचं (CM Eknath Shinde) काय होणार यावरही तर्क मांडले गेलेत. शिंदे अपात्र ठरले आणि त्यांची आमदारकी गेली तर.. या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सूचक विधान केलंय. यापूर्वीही अनेक मुख्यमंत्री झाले आहेत जे विधिमंडळाचे सदस्य नव्हते, परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय.
अधिकार कोणाला?
सुप्रीम कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवेल, असा दावा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलाय. आपला निर्णय योग्य असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. तर अपात्र ठरवण्याचा अधिकार केवळ अध्यक्षांनाच असल्याचा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय. तर आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार हा नरहरी झिरवळांना आहे, नार्वेकरांनी आधी राजीनामा द्यावा मग बोलावं असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. तर राऊत वारंवार सुप्रीम कोर्टाबद्दल पोटतिडकीने बोलत असून, त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, असं प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलंय.
कायदा काय सांगतो?
कायद्यानुसार विधिमंडळाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेता येते. मात्र त्यांना पुढच्या सहा महिन्याच्या आत विधान परिषद किंवा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून यावं लागतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं अपात्र ठरवलं तरी शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा एक प्रवाह आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील असाही एक मतप्रवाह आहे. पुढच्या काही तासात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सारं चित्र स्पष्ट होईल.