Shrikant Shinde on Viral Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde0 यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवत आहेत, असा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) हा ट्विट करत आरोप केला आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळे त्यांनी जबाबदारी त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना दिली आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण
व्हायरल फोटोवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे सक्षम मुख्यमंत्री आहेत. दिवसाचे18-19 तास ते काम करतात,  आणि त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार सांभाळायची कोणालाही आवश्यकता नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.


सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे ते आमच्या ठाण्यातल्या घरातलं कार्यालय आहे (CM Thane Home). ज्या खुर्चीवर आपण बसलो आहोत त्या खूर्चीवर बसून एकनाथ शिंदे आणि मी दोघंही जनतेची कामं करतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून हजारो लोकं ठाण्यातल्या या घरात आपल्या समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम या घरातून होत असतं असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय.


हे आमचं खासगी घर  आहे, मी मंत्रालयातील किंवा वर्षा बंगल्यावरील मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलो नाही, महाराष्ट्र शासनाचा जो बोर्ड मागे होता तो तात्पुरता ठेवण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मिटिंग होती. आताचे मुख्यमंत्री एकाच ठिकाणी बसून राज्याचा कारभार हाकत नाहीत. ते राज्यभर फिरत असतात आणि आपली काम करत असतात, असा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.
 
कुणीतरी मुद्दाहून हा फोटो काढून आम्हाला बदनाम करण्याचं कारस्थान रचत असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. 



राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळे त्यांनी जबाबदारी त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना दिली आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आपल्या चिरंजीवांना सरकार चालवण्यासाठी पुढे केलं आहे का, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. हा कोणता राजधर्म आहे, असा कसा हा धर्मवीर? असं ट्विट राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रविकांत वरपे यांनी केले आहे. वरपे यांनी केलेला फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.