`मनातले मुख्यमंत्री` पोस्टरवर भडकले अजित पवार; आमदारांना दिला इशारा
Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु होते. अशातच राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले होते. त्यावरुन आता अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग्स लावले होते. अशातच अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा सुरु होती. मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात होता. अशातच अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचीच खरडपट्टी काढली आहे.
मुख्यमंत्री पद बदलावरून वक्तव्ये करणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच खरडपट्टी काढल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितल्याचे म्हटलं जात आहे. यासोबतच अजित पवारांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम आणि आमदार अमोल मिटकरी यांनाही मुख्यमंत्री बदलाबाबत वक्तव्ये केल्याने झापले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार यावरुन चर्चा सुरू होती. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांनी आणखी भर पडली होती. सरकारमध्ये सहभागी असताना अशा प्रकारची संभ्रम व्यक्त करणारी वक्तव्ये आल्याने अजित पवार नाराज झाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या आमदारांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते अनिल पाटील?
गल्लीतील कार्यकर्त्यांपासून दिल्लीतील नेत्यांपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी इच्छा आहे. पण, त्यासाठी 145 आमदारांचा आकडा गाठण्याची गरज आहे. तो गाठल्यावर अजित पवार राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री होतील. आता शिंदे सरकारच्या पाठीमागे आम्ही आहोत," असे वक्तव्य अनिल पाटील यांनी केले होते. त्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत अनिल पाटील यांना झापलं आहे.
अमोल मिटकरींनीही केले होते ट्वीट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ट्वीट केलं होतं. "मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..! लवकरच अजितपर्व...", असं अमोल मिटकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.