Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो मात्र माझी गाडी काही पुढे गेली नाही, असं अजितदादा अनेकदा मिश्किलपणे सांगतात.. त्यांच्या मनातली मुख्यमंत्री (Chief Minister) बनण्याची इच्छा त्यांनी कधीच लपवली नाही. बुधवारी ठाण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही त्यांनी पुन्हा एकदा ही सल बोलून दाखवली. अर्थात मिश्किलपणे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. तशी ऑफर मला दिली असती तर संपूर्ण पार्टी घेऊनच आलो असतो, असं विधान अजित पवारांनी केलं. यावर अजितदादा आणि मी केलेला रेकॉर्ड कुणीच करू शकत नाही, असं वक्तव्य फडणवीसांनी यावेळी केलं. तर हा फक्त INTERVAL आहे, माझा खरा सिनेमा बाकी असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला.


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर घेतलेल्या मेळाव्यातही अजित पवारांनी (Ajit Pawar) ही खंत जाहीरपणे बोलून दाखवली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र ठारलेलं होतं. 2004 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्त असूनही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. शरद पवारांचा तो निर्णय अजित पवारांना आवडला नव्हता. त्याबाबतची नाराजी त्यांनी उघड व्यक्त केली.


अजित पवार म्हणजे राज्याच्या राजकारणातलं बेधडक व्यक्तिमत्व. त्यांच्या नेतृत्वाचा आणि कामाचा आवाका संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलाय. मात्र या धडाडीच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदानं वारंवार हुलकावणी दिलीय. आता गुलाबी जॅकेट घातल्यानंतर तरी त्यांचं हे गुलाबी स्वप्न पूर्ण होतं का? असा प्रश्न सर्वांना पडलाय.


विधानसभेचं रणशिंग फुंकलं
लोकसभा निवडणुकीत अपयश पदरात पडल्यानंतर खचून न जाता अजितदादांच्या राष्ट्रवादीनं विधानसभेचं रणशिंग फुंकलंय. नाशिकच्या दिंडोरीतून अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला सुरूवात झालीय. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांनी विधानसभा प्रचाराला सुरूवात केल्याचं पाहायला मिळतंय. जनसन्मान यात्रेदरम्यान अजितदादा देवदर्शनही घेणार आहेत. यात्रेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेतलं. जनसन्मान यात्रेदरम्यान शनिवारी अजित पवार शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेणार आहेत.


गेल्या जुलै महिन्यात राष्ट्रवादी अजित पवार गटानं विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला तो मुंबईत सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊनच. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसंह अजित पवारांनी सिद्धीविनायकाचे आशीर्वाद घेतले होते. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सुरू आहे.. मात्र जनता जनार्दनासोबतच देवाच्या दरबारात हजेरी लावून विधानसभा विजयाचं साकडंही ते यानिमित्तानं घालणार आहेत.