मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या (Medha Somaiya) यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) शिवसेनेचे (ShivSena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शौचालय घोटाळ्याचा आरोप
संजय राऊत यांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामात मेधा सोमय्या आणि त्यांच्या पतीने 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ते म्हणाले होते.


आरोप निराधार आणि निंदनीय
मेधा सोमय्या यांनी प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि निंदनीय असल्याचं म्हटलं होतं. आपली प्रतिमा खराब करण्यासाठी ते अशी विधाने करत आहेत. या आरोपाचे पुरावे द्यावेत असे आव्हान किरीट सोमाया यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. 


मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागणार?
संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'खोटी प्रसिद्धी मिळावी याकरता संजय राऊत बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यामुळे आता त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माफी मागावीच लागणार आहे. त्यांना त्यांच्या पापाचे फळ मिळणार." ते पुढे असेही म्हणाले की, "उद्धव ठाकरे सरकार गुंडगिरी करतं. घोटाळे करतं आणि स्वाक्षरीशिवाय एफआयआर नोंदवतं. गेल्या 12 महिन्यांपासून भाजप सातत्याने उद्धव ठाकरे सरकारचे घोटाळे उघड करत आहे, त्यामुळे शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे." 


INS विक्रांत प्रकरण
शौचालय घोटाळ्यांच्या आरोपापूर्वी संजय राऊत यांनी  किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर INS विक्रांत प्रकरणात घोटाळ्याचा आरोप केला होता. आयएनएस विक्रांत भंगारामध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेकडून देणगी गोळा केली होती. या देणगीतून त्यांनी 57 कोटी रुपये जमा केले होते.  


मात्र ज्या कामासाठी देणगी जमा झाली ते काम पूर्ण झाले नाही आणि किरीट सोमय्या यांनी ही रक्कम राज्यपालांकडे जमा करण्याऐवजी पक्ष निधीत जमा करून घेतली.  किरीट सोमय्या यांनी खोटे बोलून जनतेकडून पैसे घेतले. सोमय्या यांनी एकप्रकारे देशविरोधी कृत्य केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. अशा लोकांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. बाप बेटे लवकरच तो तुरुंगात जाणार असं संजय राऊत म्हणाले होते.