भाजपचा विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा, मित्रपक्षांचं काय होणार?
एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा तिढा कायम आहे, त्यात भाजपनं विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा दिलाय. या नाऱ्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांची धाकधूक वाढलीय.
Maharashtra Politics : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि खातेवाटपाचा (Port Folio) तिढा कायम आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये (Shinde-Fadanvis-Pawar Government) कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याबाबत उत्सुकता कायम असतानाच भाजपने थेट 2024 विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांसाठी महाविजय 2024 कार्यशाळेचं आयोजन भिवंडी इथं करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत भाजपने विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) 152 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. इतकंच नाही तर लोकसभेला देशात 350 हून अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवण्यात आलंय.
भाजपनं थेट 152 प्लसचा नारा दिल्यानं मित्र पक्ष असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार गटाचं काय होणार हा प्रश्न आहे. सध्या भाजपसोबत एकनाथ शिंदे गट (Shinde Group), अजित पवार गट (Ajit Pawar Group), रिपाइं आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना हे पक्ष आहेत. पण 152 प्लसचा नारा दिल्यामुळे भाजप दीडशेपेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचं दिसतंय. मात्र यामुळे मित्रपक्षांच्या वाट्याला केवळ 125 जागा येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे अपक्षांसह 50 आमदार आहेत तर अजित पवार गटाकडे 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. म्हणजे दोन्ही गटांना जेवढे आमदार तेवढ्याच जागा मिळणार का असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय.
मात्र अजित पवारांनी बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात 90 जागा लढवणार असल्याची घोषणा केलीय. त्यात रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांनीही काही जागांची मागणी केलीय. त्यामुळे भाजपचं मिशन 152चं गणित कसं जुळवणार हा कळीचा मुद्दा आहे. भाजप राज्यात नंबर एकचा पक्ष आहे आणि यापुढेही राहिल असं बावनकुळे यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप प्रचंड ताकदीने काम करेल, तीन नेतृत्वाचा फायदा महाराष्ट्राला होईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. देशामध्ये 350 पेक्षा जास्त , महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
भाजपने 2014 मध्ये विधानसभेला 122 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये जागा घटून 105 वर आल्या. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळविण्याची भाजपची रणनीती असल्याचं दिसतंय. मात्र असे प्रयत्न करत असताना भाजप मित्रपक्षांना नेमक्या किती सोडणार याबाबत उत्सुकता आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा पेच कायम असताना बावनकुळेंच्या 152 च्या घोषणेमुळे मित्रपक्षांची धाकधूक वाढलीय.