ओम देशमुख झी मीडिया, मुंबई  : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्लेला भाजप विधानसभेसाठी सतर्क झाला असून उमेदवार निश्चितीबाबत भाजपकडून तातडीने निर्णय घेतले जात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसलीय. एवढंच नाही तर तिकीट देताना भाजप भाकरी फिरवणार असल्याचे संकेत आहेत. भाजपच्या 105 आमदारांपैकी 30% आमदारांची (BJP MLA) तिकीटं कापून तिथे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. खासकरुन मुंबईत (Mumbai) अनेक आमदार डेंजर झोनमध्ये दिसतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 
यात घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम, घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह, वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, सायन कोळीवाड्याचे आमदार कॅप्टन तमिल सेल्व्हन आणि बोरिवलीच्या सुनिल राणे यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


आमदारांवर टांगती तलवार का ? 
- लोकसभा निवडणुकीत अपेक्षित मताधिक्य मिळवून देण्यात आलेलं अपयश
- संघ परिवाराची नाराजी
- कोअर मुद्द्यांची न झालेली अंमलबजावणी
- लव्ह जिहाद, व्होट जिहाद सारख्या संघ आणि भाजपपुरस्कृत विषयांकडे केलेलं दुर्लक्ष
- आणि स्थानिक समीकरणांमुळे अनेक आमदारांवर उमेदवारी न मिळण्याची टांगती तलवार आहे.


कोणाला संधी मिळणार?
वर्सोव्यात भारती लव्हेकरांऐवजी संजय पांडे यांच्या नावाला पसंती असल्याची चर्चा आहे. तर सायनमध्ये तमिल सेल्व्हनऐवजी प्रसाद लाड आणि राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा आहे. घाटकोपर पूर्वमध्ये पराग शाह यांच्याजागी प्रकाश मेहतांचं पुनर्वसन होणार असल्याचं बोललं जातंय. तर बोरिवलीत सुनिल राणेंच्या जागी गोपाळ शेट्टींच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काही आमदारांना नारळ दिला जाण्याची चिन्ह आहेत. 


भाजपाची पहिली यादी
दरम्यान भाजपची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाव अपेक्षित असलेल्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.  यादी जाहीर होण्याआधीच उमेदवारांना निवडणुकीसाठी कागदपत्रे जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 100 पेक्षा अधिक उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.