Maharashtra Politics : आतापर्यंत ज्या ज्या वेळी अजित पवार (Ajit Pawar) अडचणीत आलेत, तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले ते शरद पवार (Sharad Pawar). छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) धर्मवीर नव्हते, तर स्वराज्यरक्षक होते, असं वक्तव्य करून अजित पवारांनी नवा वाद ओढवून घेतला. राज्यभरात भाजप (BJP) आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आंदोलनं सुरू केली. हे प्रकरण अडचणीचं ठरणार, हे लक्षात येताच पुन्हा एकदा थोरले पवार मदतीला आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले शरद पवार
छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा, धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा उल्लेख करत असतो', छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर हल्ले होत असताना संभाजी महाराजांनी राज्याचं रक्षण करण्याचं महत्त्वाचं काम केलं. याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे. म्हणून त्यावर वाद घालण्याचं कारण नाही' असं सांगत शरद पवार यांनी वादावर पडदा टाकावा असं आवाहन केलं. अजितदादांच्या विरोधातला रोष कमी करण्याचा हा प्रयत्न होता. 


काकांनी बॅटिंग केल्यानंतर अजितदादा मैदानात उतरले. 
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात विधानसभेतील भाषणात जी भूमिका मांडली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे, इतिहासाचं जे वाचन आणि आकलन यांच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे, ती मी विधानसभेत मांडली असं अजित पवार यांनी म्हटलं.


अजित पवारांनी वाद निर्माण करायचा आणि शरद पवारांनी तो मिटवायचा, हे काही पहिल्यांदा घडलेले नाही..
2013 मध्ये 'धरणात पाणीच नाही, तर XXX का?' या अजित पवारांच्या विधानावरून मोठा वाद पेटला. त्यावेळी पवार काकांनीच हा वाद शांत करण्यासाठी पुढाकार घेतला. 2019 मध्ये तर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी करून भल्या पहाटे शपथविधी उरकून घेतला. त्या राजकीय संकटाच्या वेळीही भाजपसोबत गेलेल्या अजितदादांना पवारकाकांनीच पुन्हा आणलं आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केलं. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा असो की सिंचन घोटाळा, पुतण्यासाठी काकाच मदतीला धावून आले.



महाराष्ट्रात काका-पुतण्याची जोडी
महाराष्ट्राच्या राजकारणात काका आणि पुतण्यांचं नातं हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे,  सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे,  जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर अशी काका-पुतण्यांच्या वादाची अनेक उदाहरणं आहेत. पण शरद पवार आणि अजित पवार हे त्याला अपवाद ठरलेत. त्यामुळेच काका मला वाचवा, असं म्हणण्याआधीच शरद पवार 'अजितरक्षक' बनलेले असतात.