`देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले` वंचितचा खळबळजनक दावा
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा बातमी समोर आली आहे. संजय राऊत 25 जुलैला दिल्लीत नड्डांना भेटले तर फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले असा गौप्यस्फोट वंचितने केला आहे.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक सनसनाटी राजकीय दावा केला आहे. भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackre) पक्षामध्ये चर्चा सुरु असल्याचा खळबळजनक दावा मोकळे यांनी केलाय. मोकळेंनी प्रसिद्धी पत्रकात हा दावा केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत 25 जुलैला मध्यरात्री 2 वाजता, दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले होते. तर 5 ऑगस्टला रात्री 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. तिथे या दोघांमध्ये सुमारे 2 तास चर्चा झाली असा गौप्यस्फोट सिद्धार्थ मोकळे यांनी केलाय.
त्यानंतर 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. तिथे ते कोणाला भेटले, त्यांच्यात काय चर्चा झाली, हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी जाहीर करावं, असं खुलं आव्हान सिद्धार्थ मोकळे यांनी दिलंय. भाजप आणि महायुती मधील पक्ष हे काही आरक्षणवादी नाहीत, ते आरक्षण विरोधी आहेत हे जनतेला माहित आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आरक्षणवादी मतदारांनी मतदान केलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या घडामोडी बघता उद्या जर काही उलट सुलट राजकीय घटना घडल्या तर आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही ही माहिती उघड करीत आहोत, असं सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया
भाजपाला जिंकून देण्यासाठी काम करत असलेल्या लोकांच्या दाव्यावर आम्ही व्यक्त व्हावं असं आपल्याला वाटत नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. वंचित बहुजन पार्टीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा खर्च हा भाजपाच्या कार्यालयातूनच होतो असं म्हणावं का असंही सुषमा अंधारे यांनी केली आहे.
तर भाजपनेही हा दावा फेटाळून लावला आहे. देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जातील हा दावा हास्यास्पद असल्याचं भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.