Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) भविष्याबाबत केलेल्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. अमरावतीमध्ये माध्यमांसोबत बोलताना शरद पवार यांनी केलेल्या सूचक विधानामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांनी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र वेगळी भूमिका व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले शरद पवार?


2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याची चर्चा सध्या सुरु असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत माध्यमांनी विचारले असते शरद पवार यांनी केलेल्या सूचक विधानामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. "आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल?" असे शरद म्हणाले.


मविआच्या उभारणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा - संजय राऊत


"महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या सभा आम्ही कशासाठी घेत आहोत तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी.1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होणार आहे. त्या सभेला तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते येणार आहे. त्यानंतर पुणे, कोल्हापूर येथे सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या उभारणीमध्ये शरद पवार यांचा फार मोठा वाटा आहे. यामध्ये शरद पवार यांचे महत्त्व असून ते राहणार. शरद पवार यांची सुरुवातीपासून इच्छा आहे की, आपण एकत्र राहिलो तर 2024 साली भाजपचा पराभव करु आणि लोकसभासुद्धा मोठ्या संख्येने जिंकू. या शरद पवार यांच्या भूमिका आहेत. मला अजिबात असं वाटत नाही की महाविकास आघाडीबाबत त्यांची अशी काही भूमिका असेल. आम्ही सातत्याने चर्चा करत असतो. त्यांच्या बोलण्यातून महाविकास आघाडी नसावी किंवा तुटावी असं कधी वाटत नाही," असे संजय राऊत म्हणाले.


महाविकास आघाडी टिकणार नाही; शिंदे गटाचा दावा


संजय राऊत यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून शिवसेना फोडली, हे मी पूर्वीपासून सांगत आलो आहे. आघाडी कधीही राहू नये असे राऊत यांना वाटत होते. यामुळे महाविकास आघाडी टिकणार नाही, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी  केला आहे. जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांच्यासोबत कधीच नव्हते आणि राहणारही नाहीत. 1 मे रोजी होणाऱ्या सभेत अजित पवार यांच्यासाठी व्यासपीठावर खुर्ची राहणार नाही, असेही संजय शिरसाठ म्हणले होते.