Ajit Pawar Banner in Dharashiv: कौन बनेगा मुख्यमंत्री? अशी स्पर्धाच सध्या राज्याच्या राजाकारणात रंगली आहे. राज्याचे राजकारण हे मुख्यमंत्रीपद या एकाच विषयाभोवती फिरताना दिसत आहे. यामुळे चर्चेच आहेत ते विरोधी पक्ष नेते अजित पवार(Ajit Pawar). अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. थेट  सासुरवाडीतच अजित पवारांचे बॅनर झळकले आहेत. धाराशीवमधल्या तेर गावात भावी मुख्यमंत्री म्हणून चक्क अजित पवारांचे पोस्टर झळकले आहेत. अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची  लगीनघाई लागली असतानाच आता एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


 'तेरचे जावई, आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची  इच्छा बोलून काय दाखवली, त्यांच्या सासरची मंडळी आतापासूनच कामाला लागली आहेत. धाराशीवमधलं तेर ही अजित पवारांची सासरवाडी.  'तेरचे जावई, आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले मोठमोठाले बॅनर त्यांच्या सासरवाडीतल्या चौकाचौकात झळकले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचेही फोटो बॅनरवर आहेत. 


जावईबापू मुख्यमंत्री व्हावेत म्हणून काकांना साकडे


एवढंच नाही तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी तेरवासीयांनी चक्क काकांना साकडं घातल आहे. हे काका म्हणजे शरद पवारकाका नाहीत तर संत गोरोबा काका. जावईबापू मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी तेरमधील ग्रामस्थांनी चक्क संत गोरोबाकाकांच्या मंदिरात विधीवत पूजा केली आणि त्यांना साकडंही घातल आहे.


गेल्या आठवड्यात अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं वक्तव्य अजित पवारांनी केले होते. यानंतर महाराष्ट्राचं राजकारण आणखीच ढवळून निघाले.


अजित पवारांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देणारे बॅनर 


याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालयाबाहेर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देणारे बॅनर झळकले होते. आता जावयाची ही इच्छा पुरी करण्यासाठी तेरच्या जनतेनं बॅनरबाजी केली, तर त्यात आश्चर्य ते काय? अजितदादांच्या सासरच्या मंडळींची ही इच्छा पूर्ण होणार का? गोरोबाकाकांचे आशीर्वाद अजितदादांना मिळणार का? याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागल. अजितदादांनी मनात आणलं तर घोडामैदान फार दूर नाही.


रवींद्र धंगेकर म्हणतात आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावंस वाटतंय 


अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु असतानाच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनीही आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावंस वाटतंय  असे विधान केले आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर त्यात गैर काय? असा सवाल उपस्थित करत रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला आहे. मात्र, आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावंस वाटतंय असंही त्यांनी नमूद केले.  एवढंच नव्हे तर चंद्रकांत पाटलांविरोधात कोणत्याही मतदार संघात उभं राहण्याची तयारी धंगेकरांनी दाखवली. मात्र, आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावंस वाटतंय असं ओघाने बोलल्याचे स्पष्टीकरण देखील धंगेकर यांनी दिले आहे.