उमेश परब, झी मीडिया ,सिंधुदुर्ग  : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यानं सर्व पक्ष ऍक्शन मोडवर आहेत. मविआकडून (Mahavikas Aghadi) जागावाटप,मतदारसंघ, उमेदवार यांचीही चाचपणी केली जातेय. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायम असतानाच जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांत मोठा भाऊ कोण यावरुन जुंपली होती. काँग्रेस आणि ठाकरे गटातल्या मोठ्या भावाच्या वादावर नवा तोडगा काढण्यात आलाय. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष तिळे भाऊ असल्याची नवी व्याख्याच तयार करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही तिळी भावंडं'
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं मविआमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय. त्यावरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. मविआमध्ये मोठा भाऊ,लहान भाऊ कुणीही नाही. आम्ही तिळी भावंडं आहोत,असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. 


लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाची मतं मिळाल्याचं काँग्रेस कबुल करायला तयार नाही. दुसरीकडं शरद पवार गट मात्र उद्धव ठाकरेंच्या मतांचा फायदा झाल्याचं जाहिरपणे सांगतायत. तर शिवसेनेमुळे काँग्रेसचा जागा वाढल्यात हे त्यांनी विसरू नये,असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी काँग्रेसला दिलं होतं.  


आम्ही तिळे सांगून एक वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय. पण हे तिळे भाऊ जागावाटपाचा तिळ समसमान वाटून घेणार की त्यावर भांडत बसणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.