Maharashtra Weather updates : पावसाळी दिवसांनी राज्यातून काढता पाय घेतला असला तरीही बहुतांश भागांमध्ये अचानकच परतीच्या पावसानं गेल्या दोन दिवसांमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. कोकण आणि मुंबईसह पालघर, विदर्भ या भागांमध्येही पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईमध्ये सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये आकाश निरभ्र असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकंदर चित्र पाहता शहरातील कमाल तापमान 33 ते 34 अंशांदरम्यान असेल. बुधवारपासून मात्र या तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोडक्यात चालू आठवड्यापासून ऑक्टोबर हीट आणखी तीव्र होणार असल्याची चिन्हं आहेत.  फक्त मुंबईच नव्हे,  तर देशभरात ऑक्टोबर महिन्यातील तापमानाचा आकडा वाढल्याची नोंद करण्यात येईल. किनारपट्टी भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


आगामी दिवसांमध्ये तापमानाचा आकडा 35 अंशांपर्यंत पोहोचणार असून, (Konkan) कोकण आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक जाणवेल, असा इशारा निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिला आहे. एकिकडे हवामानात बदल होत असतानाच दुसरीकडे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्याही भेडसावताना दिसत आहेत. ज्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. 


पुढील 24 तासांसाठी देशात हवामान कसं असेल? 


खासगी हवामान संस्था skymet च्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये तामिळनाडूचा किनारपट्टी भाग, लक्षद्वीप, अंदमान निकोबार द्वीप समुह, कर्नाटकचा दक्षिण किनारपट्टी भाग आणि इतर काही क्षेत्रांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, देशाच्या उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये तापमानात घट नोंदवली जाणार आहे. 


हेसुद्धा वाचा : ENG vs AFG : नेमकी चूक कोणाची? सॅम करन की कॅमेरामॅन? Video पाहून तुम्हीच सांगा!


 


हिमाचल, जम्मू काश्मीर, उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये हलकी बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. तर, बिहार, सिक्कीम, दक्षिण कोकण आणि पुर्वोत्तर भारतातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची अपेक्षा आहे. त्यामुळं देशातील हवामान क्षणाक्षणाला बदलेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.