मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका रूग्णांना बसतोय. आजही मुंबईतील जेजे, सेंट जॉर्ज, जीटी आणि कामा रूग्णालयातील रूग्णसेवेवर मोठा परिणाम जाणवतोय. जेजे रूग्णालयातील २६००, तर सेंट जॉर्जमधील १ हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. तसंच जीटी आणि कामा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारलाय. त्यामुळं नियोजित शस्त्रक्रिया पुढं ढकलण्यात आल्या असून केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सकाळपासून जेजेमध्ये ३२ रुग्णांना दाखल करण्यात आलंय, तर आतापर्यंत ७ शस्त्रक्रिया पार पडल्यात. दरम्यान, प्राध्यापक डॉक्टर, निवासी डॉक्टर हे कामावर हजर असून ओपीडी सुरू आहे. परंतु परिचारिका आणि इतर कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं ओपीडीवरही परिणाम जाणवतोय. केवळ अत्यावश्यक सेवा  रुग्णालयाकडून पुरवल्या जातायत. 


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपाचा कार्यालयात चांगलाच परिणाम दिसून आला. मुंबईत मंत्रालयातही मोठ्या प्रमाणात कर्मचारी अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे राज्याच्या सर्वच जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी संपाचा परिणाम दिसून आला. सर्वच शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. कर्मचारीच कामावर नसल्याने अनेकांना आल्यापावली जावं लागत होतं