मुंबई: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा २०१६ ते २०२०च्या वेतनकराराला राज्य सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून नवीन वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे. त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना जून महिन्यापासून मिळणाऱ्या पगारासाठी होणार आहे. कर्मचाऱ्यांचे जूनपासूनचे पगार वाढून येणार आहेत.


एकमताच्या अभावामुळे रखडला करार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांचा दर चार वर्षांनी वेतनकरार होतो. मात्र २०१६ ते २०२० चा वेतनकरार करण्यासाठी एसटी प्रशासन आणि मान्यता प्राप्त संघटनांमध्ये एकमत होत नव्हतं. त्यामुळे हा वेतनकरार रखडला होता. या वेतनकरारासंदर्भात ३३ बैठका पार पडल्या. मात्र, तरीही तोडगा निघू शकला नव्हता. त्यामुळे कराराला २३ महिने विलंब झाला.


अखेर तोडगा निघाला


दरम्यान, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ४ हजार ८४९ कोटींचा वेतनकरार जाहीर केला होता. मात्र तो मान्य नसल्याने कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जूनला अघोषित संप केला. त्यानंतरही वेतनकरारावर तोडगा निघाला नाही. अखेर आता राज्य सरकारनेच कामगार कराराला मंजुरी दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा वेतनकरार लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचा पगार ५ ते १२ हजारापर्यंत वाढणार आहे.