Maharashtra Vidhansabha Election : मंगळवारी रात्री उशिरा विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महायुतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची यादी जाहीर करण्यात आली. एकिकडे भाजपनं पहिल्या यादीत 99 उमेदवारांना संधी दिलेली असतानाच दुसरीकडे शिंदेंच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या यादीत 45 नावं जाहीर करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपप्रमाणंच शिवसेनेच्या यादीतसुद्धा काही ओळखीची नावं पाहायला मिळाली. इतकंच नव्हे, तर महायुतीच्या याद्यांमध्ये 'भावकी'चा विजय होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीच्या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे ठाण्यातील कोपरी- पाचपाखाडी येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर या यादीत लक्ष वेधणारी नावं आणि नातीही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांना पैठण मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांना दर्यापूर येथून उमेदवारी मिळाली असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. 


हेसुद्धा वाचा : अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेने दिला तगडा उमेदवार; माहीमची जागा अटीतटीची ठरणार, काय आहेत समीकरणं?


तीन आमदार पुत्रांना पहिल्यांदाच संधी 


पैठण -  विलास संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे वडील संदीपान भुमरे लोकसभेवर निवडूण गेल्यामुळे विलास यांना तिकीट देण्यात आलं. 
आटपाडी – खानापूर  - सुहास अनिल बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे वडील अनिल बाबर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं.
एरंडोल – चिमणराव पाटील यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी


 


भाजपमध्येही नेत्यांच्याच कुटुंबात गेली उमेदवारीची तिकीटं.. 


फक्त शिंदेच नव्हे, तर महायुतीत भाजपच्या फळीमध्येसुद्धा प्रस्थापितांना महत्त्वं दिलं गेल्याचच काही दिवसांपूर्वी स्पष्ट झालं. बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांनाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तर ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांच्या तिकीटावर शिक्कामोर्तब झालं. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. तर, श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या जागेवर प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली गेली. इचरकरंजी मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला म्हणजेच राहूल आवाडे यांना तिकीट देण्यात आलं आहे. मालाड पश्चिमचं तिकीट आशिष शेलार यांचे बंधू विनेद शेलार यांच्या नावे देण्यात आलं आहे. 


राजकीय वर्तुळात नातेसंबंधांमध्ये देण्यात आलेली ही तिकीटं चर्चेचा विषय ठरत असून फक्त महायुतीच नव्हे, तर इतरही पक्षांमध्ये असंच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं भावकीचाच विजय झालाय असं म्हणणं गैर ठरणार नाही.