Maharashtra Weather News : विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर आता या संकटानंतर हवामानात पुन्हा बदल झाले आहेत. सध्या राज्याच्या काही भागांमध्ये दुपारच्या वेळी उन्हाचा दाह वाढू लागला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात हे चित्र पाहायला मिळत आहे. पण, याच वेळी मुंबईसह उपनगरीय क्षेत्रांमध्ये हवामानाची विचित्र स्थिती पाहायलाही मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सायंकाळपासूनच शहरातील किमान तापमानाच काही अंशांची घट नोंदवण्यात आली. हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सक्रिय असल्यामुळं तो थेट शहरातील वातावरणावर परिणाम करताना दिसत आहे. ज्यामध्ये बाष्पयुक्त थंड वारे वाहत असून पुढच्या 24 तासांमध्ये दिवसभर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर, तापमानातही गेल्या 24 तासांप्रमाणंच घट नोंदवली जाऊ शकते. 


ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, हिमालयीन परिसरासोबतच उत्तर भारतात पश्चिमी झंझावात सक्रिय आहे. वाऱ्याचा हा झोत अरबी समुद्रावरून प्रवास करत आता मुंबईसह राज्याच्या किनारपट्टीवर पोहोचला आहे ज्यामुळं रविवारपासून शहरातील वातावणात गारठा पाहायला मिळत आहे. 


अचानक वाढलेल्या उकाड्यामुळं त्रासलेल्या मुंबई आणि नवी मुंबईकरांना या अनपेक्षित थंडीमुळं काहीसा दिलासा मिळाला हेसुद्धा तितकंच खरं. दरम्यान, पुढच्या 24 तासांमध्ये शहरासह राज्याच्या काही भागांवर पावसाच्या ढगांचं सावट असेल. तर, क्वचित ठिकाणी पावसाच्या तुरळक सरींची हजेरीही नाकारता येत नाही असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


देशातील हवामानातही मोठे बदल 


मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या बहुतांश भागांमध्येसुद्धा हवामानात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. देशाच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टी सुरु असून, याच पर्वतीय राज्यांच्या मैदानी क्षेत्रांना पाऊस झोडपताना दिसत आहे. हिमवृष्टीचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसल्यामुळं आता उत्तरेकडून पुन्हा एकदा शीतलहरी देशाच्या इतर राज्यांच्या दिशेनं कूच करताना दिसत आहेत. ज्यामुळं मार्च महिन्यातही ही थंडी कायम आहे हेच खरं. 


हेसुद्धा वाचा : Pune News : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कोणाचा? रोहित पवारांना सरकारला खडा सवाल!


Skymet या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये एक पश्चिमी झंझावात पूर्वेच्या दिशेनं पुढे जात कमकुवत होणार आहे. परिणामस्वरुप देशाच्या मैदानी  भागांमध्ये यामुळं पावसाची शक्यता आहे. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये याचा फारसा परिणाम दिसून येणार नाही. 8 मार्च रोजी हवामानाच्या या स्थितीमध्ये सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.