मुंबई : अकरावीचे प्रवेश कशापद्धतीने होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम होता. अखेर शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशासाठी होणारी परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दहावीचा निकाल कशापद्धतीने लावणार, अकरावीचे प्रवेश कशा पद्धतीने होणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित करण्यात आले होते. यावर मूल्यमापन पद्धतीनुसार दहावीचे निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11 वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


2020-21 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा अर्ज भरलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेलं असल्यानं त्यांना सीईटीसाठी शुल्क भरावे लागणार नाही. पण, सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून निश्चित केलेलं शुल्क भरावे लागणार आहे.


अशी असेल परीक्षा
CET राज्य मंडळाच्या इयत्ता 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर 100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसंच OMR पद्धतीने 2 तासांची परीक्षा घेण्यात येईल. यात इंग्रजी,गणित,विज्ञान,सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा offline घेण्यात येईल.


ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसंच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी  माहिती जाहीर करण्यात आली आहे.


इयत्ता 10 वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इयत्ता 11वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवड्यात आयोजित केली जाईल.