मुंबई : Maharashtra Winter Session : हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 28 डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी विरोधक आग्रही होते. चर्चा न करता विधानसभा अध्यक्षपद निवडणूक (Maharashtra Assembly Speaker Election) जाहीर केल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळी अधिवेशनाबाबत आज कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी 28 डिसेंबरपर्यंत अधिवेशन सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे. तसेच या निवडणुकीत सत्ताधारी बाजी मारतात की विरोधक याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाऐवजी आवाजी मतदानाने निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. 


अधिवेशन वाढवण्याबाबत विरोधी पक्षांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत भूमिका मांडली होती. मात्र अधिवेशन कालावधी वाढवला नाही. सोमवारी 27 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले.


दरम्यान, विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी पत्र पाठवणार आहे. 27 तारखेला विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करून 28 डिसेंबर मतदान होणार आहे.


मात्र, विधीमंडळ कामकाज सल्लागार बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली नाही, यामुळे भाजप नेते नाराज आहेत. अध्यक्षपद निवडणूक चर्चा न करता निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याच्या हालचालीवरून सल्लागार समितीत भाजप सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.