मुंबई : आज मकरसंक्रांत... सूर्याच्या संक्रमणाचा हा दिवस... मोठी झेप घेण्याचं हे निमित्त... याच निमित्तानं आज जाणून घेणार आहोत एका महाराष्ट्राच्या गुणी आणि धाडसी कन्येचा प्रवास....


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावात शिकत असताना तिला आकाश खुणावत होतं. स्वप्नांवर दृढ विश्वास असलेली ती जिद्दीनं पुढे चालत राहिली आणि एक दिवस तिला आकाशानं कवेत घेतलंच. मोठ्या संक्रमणासाठी..... 


अनिमा पाटील यांचा जळगाव ते नासा हा प्रवास थक्क करणारा आहे. जळगावात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली अनिमाने अंतराळात झेप घेतलीय. अनिमा नासाच्या एम्स रिसर्च सेंटरच्या इंटेलिजन्ट सिस्टिम विभागात अभियंता म्हणून काम करतायत. 


जळगावच्या अनिमा यांचा जन्म १९ ऑगस्ट १९७४ ला धुळ्यात झाला. प्राथमिक शिक्षण जळगावच्या सेंट जोसेफ शाळेत झालं. लहानपणापासून वाचनाची आवड होती. शाळेत असताना अमेरिका आणि रशियाच्या अवकाश भ्रमंतीबद्दल त्यांनी एका पुस्तकात वाचलं. राकेश शर्मांबद्दल वाचलं आणि तेव्हापासूनच त्या दिशेनं अनिमाचा प्रवास सुरू झाला.


जळगावमधल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भौतिकशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बीएससी केलं. आंतराळयात्री होण्यासाठी काय करायचं, याची शोधाशोध सुरूच होती. मग त्यासाठी भारतीय वायुदलाचत जायचं ठरलं. पण दृष्टीदोषामुळे या प्रयत्नात अपयश आलं.पण अपयश ही यशाची पहिली पायरी होती.


पुढची पायरी त्यांना लगेच सापडली. ती होती संगणक विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून ‘एमसीए’ची पदवी. त्या जोरावर मुंबईतल्या मायक्रोटेक्नॉलॉजी कंपनीत नोकरीची संधी मिळाली. 


दोन वर्षांच्या अनुभवानंतर अमेरिकेतल्या मेलस्टार कंपनीकडून त्यांना मुलाखतीसाठी बोलावणं आलं.  अमेरिकेत जातानाही अवकाशभरारीच्या स्वप्नाची सोबत होतीच. अमेरिकेत गेल्यावर पहिलं काय केलं असेल तर नासा स्पेस सेंटर पाहिलं आणि पुन्हा आकाश खुणावू लागलं. त्यासाठी कॅलिफोर्नियातल्या सॅन ओजे विद्यापीठात ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’ विषय घेऊन एमएसचं शिक्षण घेण्याचा निर्धार केला.


स्वप्न नजरेच्या टप्प्यात दिसू लागलं आणि अखेर नासाचं दार उघडलं. २०१२ मध्ये ‘नासा’कडून बोलावणं आलं. केपलर मिशनमध्ये सीनिअर प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून अनिमा रुजू झाली. नासात काम करायचं असेल तर अमेरिकेचं नागरिकत्व लागतं. मग अनिमानं अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं.


कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांचा आदर्श ठेवत अनिमाची नासामधली वाटचाल सुरू झाली. दरम्यानच्या काळात अनिमाचं लग्न झालं. तिचे पती दिनेश साबळे हे अमेरिकेतच सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. आई, वडील, पती त्यांच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळेच ही गगनभरारी शक्य झाल्याचं अनिमा सांगतात. 


पुढच्या काळात अनिमा दोन मुलांची आई झाल्या. त्यानंतरही नासामधलं काम जोमानं सुरू आहे. या वर्षात अनिमा नव्या भरारीसाठी सज्ज आहेत.


जळगाव ते नासा हे अनिमाचं संक्रमण भन्नाट आहे. तेवढाच प्रेरणा देणारा आहे. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, हे अनिमा पाटील आवर्जून सांगतात.


पुढच्या काळात अनिमा यांचा नासामधला प्रवास अधिक समृद्ध आणि मोठ्या भरारीचा असणार आहे. त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा....



महाराष्ट्राच्या गुणी आणि धाडसी कन्येचा प्रवास