दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांवर निकषात बसत नसतानाही आतापर्यंत राजकीय सोय म्हणून अनेकांची नियुक्ती केली जायची. यावेळी मात्र तसे घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे सत्ताधारी तीनही पक्षही सावध झालेत. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार सुरू असलेल्या संघर्षात राज्यपाल विधानपरिषदेवरील नियुक्त्या निकषाच्या कसोटीवर तपासूनच करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे निकषात बसणारे उमेदवार शोधण्याची धावपळ सुरू झालीय. त्यामुळेच आज काही सदस्यांची मुदत संपत असतानाही महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावेही निश्चित केलेली नाहीत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 10 सदस्यांची मुदत 6 जूनला तर 2 सदस्यांची मुदत 15 जूनला संपत आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडी सरकारधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आपल्या कार्यकर्ते, पदााधिकाऱ्यांची वर्णी लावता येईल. मात्र आतापर्यंत जे घडत आलं ते आता होणार नाही याची कल्पनाही या तीन पक्षांना आहे. 

आतापर्यंत राज्यपाल नियुक्त जागांसाठी सत्तेत असलेल्या पक्षाकडून पाठवण्यात आलेल्या नावांना राज्यपालांकडून तातडीने मंजूरी दिली जात होती.  मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसं करणार नाहीत, याची कल्पना महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष पाहता या 12 जागांना मंजूरी देताना राज्यपाल प्रत्येक उमेदवाराचा बायोडेटा निकषाच्या कसोटीवर तपासणार, त्यामुळेच निकषात बसणारे उमेदवार शोधण्याची वेळ या तीनही पक्षांवर आली आहे.



भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171 (1) अन्वये '12 सदस्य राज्यपाल द्वारा नामनियुक्त होत असतात. या जागांवर साहित्य, कला, शास्त्र, सहकारी चळवळ, समाजसेवा या क्षेत्रात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच नामनिर्देशित केले जाते.मुख्यमंत्री राज्यपाल नियुक्त जागांच्या नावांची शिफारस मंत्रिमंडळ बैठकीत ठेवतात आणि त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठविली जातात.

प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी खालील संकेत अथवा निकष आहेत


*साहित्य – किमान ४ पुस्तके प्रकाशित, अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनात साहित्यकृतीचे सादरीकरण, मानांकित साहित्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती
*कला – कला (रंगकर्मी) क्षेत्रातील व्यक्ती
*शास्त्र – विज्ञान क्षेत्रात कार्य, संशोधक, संशोधनांचे सादरीकरण, पेटेंटधारक, वैज्ञानिक
*सहकारी चळवळ – सहकारी संस्था चालविण्याचा अनुभव, सहकारात क्षेत्रात योगदान
*समाजसेवा – शिक्षण, समाजकारण, NGO या माध्यमातून किमान १० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रीय


या १२ पैकी दोन जागा यापूर्वीच रिक्त झाल्या होत्या. त्यासाठी सरकारने राष्ट्रवादीच्या दोन जणांची नावंही पाठवली होती. मात्र ती कोणत्याच  निकषात बसत नसल्याने राज्यपालांनी त्याला मंजूरी दिली नव्हती. आताही राज्यपाल विरुद्ध सरकार संघर्ष पाहता राज्यपाल या निकषांच्या आधारेच नावांना मंजूरी देतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या निकषात बसणारे उमेदवार शोधण्यासाठी शिवसेना ,काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यपाल नियुक्त जागांची मुदत संपली असली तरी अद्याप महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी या जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केलेले नाहीत. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निकषात बसणारे आणि आपल्या पक्षाच्या विचारधारेशी सलग्न असलेले उमेदवार शोधण्याची सध्या या तीनही पक्षांची धापवळ सुरू आहे. त्यामुळे मुदत संपूनही या जागा भरण्यास आणख काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.


६ जूनला मुदत संपत असणारे राज्यपालनियुक्त सदस्य
विद्या चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
ख्वाजा बेग (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रकाश गजभिये (राष्ट्रवादी काँग्रेस)
जगन्नाथ शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
रामहरी उपनवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
जनार्दन चांदुरकर (काँग्रेस)
हुस्नबानू खलिफे (काँग्रेस)
आनंदराव पाटील (काँग्रेस)

१५ जूनला मुदत संपत असणारे राज्यपालनियुक्त सदस्य
अनंत गाडगीळ (काँग्रेस)
जोगेंद्र कवाडे (रिपब्लिकन पार्टी कवाडे गट)

* राहुल नार्वेकर विधानसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांची जागा रिक्त आहे.
* तर रामराव वडपुते यांनी यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त आहे.