दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असताना, दुसरीकडे मुंबईमध्ये महाविकासाघाडीच्या नेत्यांची समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महामंडळ वाटप आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या वाटपाबाबत चर्चा झाली. महामंडळ वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली असून, मुख्यमंत्र्यांशी अंतिम चर्चा होऊन निर्णय होईल, असं महाविकासाघाडीच्या नेत्यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राज्यमंत्र्यांना पूर्वीप्रमाणे अधिकाराचं वाटप केलं जाईल, असं ठरवण्यात आलं. राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहण्याबाबतही चर्चा झाली. ज्या खात्याचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत असेल, त्या खात्याच्या राज्यमंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहता येईल. या बैठकीला शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील तर काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते. 


येत्या १० दिवसांमध्ये महामंडळ वाटप करण्याचा महाविकासाघाडीचा प्रयत्न असणार आहे. 'आज झालेल्या बैठकीची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊ, पुढेही चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील', अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी या बैठकीनंतंर दिली.