दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमधल्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला वाढत चालला आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसंच कोरोना आणि लॉकडाऊनवरही चर्चा झाली. या बैठकीसाठी काही मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले.


या आठवड्यातली शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली ही तिसरी भेट असेल. याआधी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गृहमंत्रालयाकडून केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या होत्या. यानंतर महाविकासआघाडीत तणाव वाढला होता. म्हणून सोमवारी शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 


मागच्या शुक्रवारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकात बैठक झाली होती. मंत्र्यांना न विचारताच लॉकडाऊन कडक करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्री नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले होते.