राज्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वीज दरवाढीचा झटका
ऐन निवडणुकीच्या काळात ही वीजदरवाढ होत असल्याने त्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत
मुंबई : ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा चटका बसलाय. राज्य वीज नियामक आयोगानं सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या वीज दरवाढीच्या आदेशानुसार महावितरणचे वीज दर वाढणार आहेत. १ एप्रिल २०१९ पासून वीज दरवाढ होणार आहेत. घरगुती वीज ग्राहकांना सरासरी तीन टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. या तीन टक्के वाढीव्यतिरिक्त स्थिर आकारातही १० रुपयांची वाढ होणार आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ही वीजदरवाढ होत असल्याने त्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
महावितरणच्या दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांचा वीजदर ५.३० रुपये प्रति युनिट होता. आता या ग्राहकांची वीज १६ पैशांनी महाग होऊन त्यांना ५.४६ प्रति युनिट मोजावे लागतील.
१०१ ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांची वीज युनिटमागे २४ पैशांनी महाग होईल.
५०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांची वीज १५ पैशांनी महाग होणार आहे.वीजदरांबरोबरच स्थिर आकारातही १० रुपयांची वाढ होणार आहे. तो ८० रुपयांवरून ९० रुपये होणार आहे.
इतकेच नव्हे तर महावितरणची १२ हजार ३८२ कोटी रुपयांची दरवाढ तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली असून, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर कधीही ती लागू होण्याची शक्यता आहे.