मुंबई: अंधेरीच्या कामगार रुग्णालयात सोमवारी दुपारी लागलेली आग अखेर नियंत्रणात आली आहे. मात्र, या दुर्घटनेत पाच जणांना प्राण गमवावे लागले. यापैकी एका महिलेने घाबरून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. तर अन्य एका रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यानंतर उपचारादरम्यान आणखी तिघांना प्राण गमवावे लागले. या आगीत १०८ जण जखमी झाले असून यापैकी १५ जखमींना कूपर रुग्णालयात, २३ जखमींना बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात, ४० जखमींना होली स्पिरिट रुग्णालयात तर ३० जखमींना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी मरोळ भागात तळ अधिक पाच मजल्यांचे कामगार रुग्णालय असून सायंकाळी चार वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आगीचा भडका उडाला. आगीबाबत पावणेपाचच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने १० बंब, रेस्क्यू व्हॅन व अन्य सामग्रीसह अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले. 


चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरजवळ आग लागली व नंतर पूर्ण मजल्यावर पसरली. आग लागल्यानंतर रुग्णालयात एकच घबराट पसरली. अनेक रुग्ण खिडकीत येऊन मदतीसाठी धावा करत असल्याचे पाहायला मिळत होते. काही रुग्णांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांना फ्रॅक्चरही झाले आहे. यानंतर अग्निशमन दलाने स्नॉर्केल शिडी लावून उर्वरित कर्मचारी व रुग्णांना सुखरूपणे खाली उतरवले. 


दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, शॉक सर्किटमुळे आग लागली असावी. यानंतर वातानुकूलित यंत्रणेसाठी वापरण्यात येणाऱ्या पुठ्ठ्यांमुळे ही आग पसरत गेली, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या अग्निशमन दलाकडून रुग्णालयात कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.