मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहेत. 8 वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यात 727 अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक या पदांचे हे अधिकारी आहेत. या 727 अधिकाऱ्यांना मुंबईबाहेर जाण्यासाठी तीन जिल्ह्यांची पसंती नमूद करण्यास सांगण्यात आलंय.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचमधील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना झालेली अटक, त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची करण्यात आलेली उचलबांगडी आणि पाठोपाठ परमबीर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकलेला लेटरबॉम्ब अशा स्फोटक घटनाक्रमानंतर मुंबई पोलीस दलात घाऊक बदल्या करून अनेकांना दणका देण्यात आला आहे.