प्रथमेश तावडे,झी मीडिया,वसई : बिट क्वाईनमध्ये हरलेल्या दहा लाख रूपायांबाबत बायकोला कसे सांगायचे ? या विचारात विरार मधील एका व्यापाऱ्याने चक्क चोरीचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. मात्र पोलिसांच्या तपासात ही चोरी नसून चोरीचा बनाव असल्याचे उजेडात आले. व्यापाऱ्याच्या बनावाचा भांडाफोड झाला. शुभंत लिंगायत असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार मध्ये राहणाऱ्या या व्यापाऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमविलेले दहा लाख रुपये बिट कोईन मध्ये हरला होता. मात्र याबाबत घरी सांगता येणार नसल्याने त्याने हे पैसे चोरी झाल्याचा बनाव आखला. 


सोमवारी १ वाजताच्या सुमारास वसई पश्चिमेच्या पापडी परिसरात असलेल्या साई सर्व्हिसमध्ये तो गाडी खरेदीसाठी टोकनं देण्याच्या बहाण्याने गेला. रिक्षातून उतरताना त्याची दहा लाख रुपयांची बॅग एका चोरट्याने पळवली असा त्याने प्लॅन आखला व तशी वसई पोलीस ठाण्यात तक्रार केली. 


वसई पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी व्यापाऱ्याची कसून चौकशी केली असता पोलिसांनाही चक्रावून जाण्याची वेळ आली. 


मुलीच्या लग्नासाठी जमविलेले पैसे बिटकोईन मध्ये हरल्याने त्याने हा चोरीचा बनाव आखल्याचे पोलीस तपासात उघड झाले. हा व्यापारी किराणा दुकानांना माल विक्रीचा व्यवसाय करत असून बायकोच्या कटकटी पासून वाचण्यासाठी त्याने हा बनाव केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली.