मुंबई : माण. सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. यंदा ४ जानेवारी ते ७ जानेवारी हा महोत्सव रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते माणदेशी महोत्सवाचे उदघाटन प्रास्तवित आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी होणार आहे, अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दिली.


काय आहे या माणदेशी महोत्सवामध्ये पाहण्यासाठी?


मुंबईकरांना महोत्सावामध्ये माणदेशाची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. या वर्षी माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्स देखील खरेदी करता येणार आहे. यावर्षी कर्नाटक, काश्मीर, लखनौ आणि कलकत्ता येथील कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.


गेल्यावर्षी तब्बल २० हजार मुंबईकरांनी माणदेशी महोत्सवास भेट दिली होती. नंदा शेलार या शेतकरी महिलेने त्यांच्या शेतात पिकलेल्या १५० किलो भाताची विक्री केली. आज त्या भाताच्या मोठ्या उत्पादक विक्रेत्या आहेत. माणदेशी महोत्सवामुळे वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज त्या त्यांच्या गावच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. अशा अनेक यशोगाथा माणदेशी महोत्सवाने साकार केल्या आहेत.


मुंबईकरांना गावाकडील संस्कॄतीचा प्रत्यक्ष अनुभव


या महोत्सवाचे आणखी प्रमुख आकर्षण म्हणजे बारा बलुतेदार. बारा बलुतेदार हे आपण फक्त पुस्तकात वाचलेले असते. पण ग्रामसंस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. आपण स्वत:च्या हाताने मडकं वा लाटणं बनवू शकता किंवा फेटा बांधायचा कसा हे शिकू शकता. तसेच चपला तयार करणारे, दागिने बनविणारे किंवा कपडे विणणाऱ्या कलाकारांची कला पाहू शकता.


दर संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा देखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. खास माण तालुक्यातील गाझी लोकनृत्याचा आस्वाद देखील या महोत्सवादरम्यान घेता येणार आहे. एका सायंकाळी उपस्थितांना महिला कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.


माणदेशी महोत्सवातील यंदाचे मुख्य आकर्षण


यंदा माणदेशी महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे चेतना सिन्हा यांचे ‘छावणी एक भागीरथी प्रयत्न’ पुस्तक. २१ एप्रिल २०१२ ते १६ सप्टेंबर २०१३ या दीड वर्षांत १२९३६ गुरांसाठी आणि ३ हजार कुटुंबाची चारा छावणी माणदेशी फाऊंडेशनने चालवली होती. या छावणीला कॅमेऱ्यात कैद करुन ते पुस्तकरुपाने आता उपलब्ध होणार आहे. हे पुस्तक म्हणजे तिचं दस्तावेजीकरन. ना.धो. महानोर आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,”प्रत्यक्ष त्या दुष्काळी काळातली चित्रलीपी पाहताना आपण सुन्न होऊन जातो. असं हे कमी शब्दांच आणि शब्दाशिवायच छायाचित्रांमधून अधोरेखित केलेले काम. माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांच्याच संकल्पनेतून चित्रलिपी पुस्तक आकारास आले आहे. या महोत्सवादरम्यान ‘छावणी एक भागीरथी प्रयत्न’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.


व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या ६ शाखा


माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा या जानेवारी २०१८ मध्ये दावोस-स्विझर्लंड येथे होणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या सह-अध्यक्ष आहेत. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून ३००,००० महिलांनी व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपले व्यवसाय यशस्वी केले आहेत. सध्या महाराष्ट्र, दादरा-नगर, हवेली, कर्नाटकमध्ये माणदेशी फाऊंडेशन एकूण ११ व फिरत्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या ६ शाखा आहेत.


मोफत महोत्सव


गुरुवार ४ जानेवारी ते रविवार ७ जानेवारी, ४ दिवस प्रभादेवी येथे चालणारा माणदेशी महोत्सव सर्वांसाठी मोफत आहे, या महोत्सवास मोठ्या प्रमाणावर भेट देऊन मुंबईकरांनी आपल्या माणदेशी भगिनींना प्रोत्साहीत करावे असे आवाहन महोत्सवाचे आयोजक माणदेशी फांऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले आहे.