मुंबई : केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी मुख्यमंत्र्यांना काल पाठवलेल्या पत्रात वन खात्यावर गंभीर आरोप केलेत. 'वनविभाग अवनी वाघीणीच्या बछड्यांना वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नसून बछड्यांचा मृत्यू होईपर्यंत अथवा ते ठार मारले जाईपर्यंत त्यांचा शोध घेऊ नये अशा सूचना यवतमाळ वनविभागाला देण्यात आल्या आहेत', असा आरोप मनेका गांधींनी केलाय. अवनी वाघिणीला मारल्यानंतर मनेका यांनी आपलं दु:ख ट्वीटरवरून व्यक्त केलं होतं. यानंतर मनेका गांधी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळाली.


मुनगंटीवार विरुद्ध गांधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 3 नोव्हेंबर रोजी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर एक पथक यवतमाळला पाठवले होते. वन विभागाचे स्थानिक अधिकारी बछड्यांचा शोध घेण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नसल्याचे या पथकाला आढळून आले. 'बछड्यांचा मृत्यू होईपर्यंत अथवा ते ठार मारले जाईपर्यंत त्यांना शोधू नये अशा सूचना स्थानिक वन अधिकाऱ्यांनी दिल्या गेल्या आहेत', असं पथकाला सांगण्यात आल्याचं मनेका गांधींनी पत्रात म्हटलंय. मनेका गांधींच्या पत्रानं आता मुनगंटीवार विरुद्ध मनेका गांधी यांच्यातला संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे.


मनेकांना दु:ख


'वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे.


अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता.' असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.


वनखात्याचे स्पष्टीकरण 


टी१ वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न न करताच तिला गोळ्या घालण्यात आल्या. तसेच तिला मारताना अनेक नियमांचेही उल्लंघन करण्यात आले, असा वन्यप्रेमींचा आरोप आहे.


या पार्श्वभूमीवर वन विभागकडून रविवारी पहिल्यांदा मौन सोडण्यात आले. वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला होता.


मात्र, हा प्रयत्न फसला आणि वाघिणीने गस्ती पथकावर हल्ला चढवला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ वाघिणीवर गोळी झाडावी लागली, असे स्पष्टीकरण वनखात्याने दिले आहे.