प्रवीण दाभोळकर, मुंबई : सात बेटांनी बनलेली मुंबई समुद्राच्या पाण्याने वेढली आहे. त्यात भर घालून आपण समुद्राला आणखी जवळ आणले आहे. अशावेळी जमिनीची धूप रोखण्यासाठी कांदळवनाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारने मॅन्ग्रोव्हस म्हणजेच कांदळवन संरक्षणासाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. यामुळे मुंबईतल्या कांदळवन क्षेत्रात ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, शिवाय यातून रोजगार निर्मितीही होऊ लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ जुलै २००५ च्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान, कांदळवनं असलेल्या ठिकाणांचं कमी नुकसान झाल्याचं निरीक्षणातून समोर आलं. यातून कांदळवनाचं महत्त्व अधोरेखीत झालं. त्याचसोबत गरज निर्माण झाली ती याबद्दलच्या जनजागृतीची, अशी माहीती मॅन्ग्रोव्हस फाऊंडेशन (प्रकल्प) सह संचालिका डॉ. शितल पाचपांडे यांनी दिली.


कांदळवनाच्या प्रजाती 


शहरामध्ये अजूनही कांदळवनाच्या सफरीला गेल्यास तिथे तुम्हाला तिवर, सोनचिप्पी, पांढरीचिप्पी, लालचिप्पी, झुंबर अशा प्रजाती आढळतील. पावसाच्या दिवसांत खेकडे, मासे अशा समुद्र जिवांच्या प्रजननासाठी ही कांदळवनं मदत करतात. अन्नसाखळीलाही यामुळे मदत होत असते.  


 'मॅन्ग्रोव्हज सेल'ची स्थापना


२०१२ साली महाराष्ट्र शासनाने 'मॅन्ग्रोव्हस सेल'ची स्थापना केली. या माध्यमातून मॅन्ग्रोव्हस लागवड - संवर्धन तसंच कांदळवनांवरील अतिक्रमण रोखण्याचं काम केलं जातं. साधारण १५ कोटींचा निधी वापरुन गावकऱ्यांना कांदळवन हे उपजिविकेचा पर्याय म्हणून समोर येत आहेत. साधारण ४० फिशरी पदवीधर हे काम पाहत असून कांदळवन संरक्षणासोबत गावकऱ्यांना रोजगार निर्मितीही होऊ लागली आहे. वेंगुर्ल्यातील स्वामीनी बचत गट वल्हवाची बोटीच्या सफरीसहीत पर्यटकांना 'इको टुरिझम'चाही आनंद देतात. तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीत सध्या महिला बचत गटांना एकत्र करुन त्यांना कांदळवनातून होणाऱ्या उपजिविकेबाबत प्रशिक्षण देऊन रोजगार सक्षम बनवलं जात आहे, अशी माहिती मॅनग्रोव्हज सेलचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन वासुदेवन यांनी दिली.


फ्लेमिंगो दर्शन


यामध्ये खेकडा पालन, मत्स्यपालन ऐरोलीतील 'कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर'च्या माध्यमातून फ्लेमिंगो दर्शन, कांदळवन जागृतीचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाते. आगामी काळात गोराई आणि दहीसरमध्येही भव्य मॅनग्रोव्हज पार्क उभारण्यात येणार आहेत, असे ठाणे खाडी, फ्लेमिंगो अभयारण्य वनपरीक्षेत्र अधिकारी एन जी कोकरे यांनी सांगितले.


कांदळवनांवरील अतिक्रमणांवर कारवाई


'मॅन्ग्रोव्हस सेल' अंतर्गत ६ हजार कांदळवनांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. १५,३०० हेक्टर शासकीय जमिनीवरील कांदळवने राखीव वने म्हणून घोषित करण्यात आली. कांदळवन हे निसर्गाचं मानवाला मिळालेले लाभदायी देणे आहे. त्याचे जतन, रक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.