मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात देशभरात जनभावना आहे. मात्र, भाजपवाले जिंकण्यासाठी ईव्हीएम घोटाळा करु शकतात, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह संयुक्त महाआघाडीच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ईव्हीएम प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेतून जावे, ही जनभावना असली तरी ईव्हीएम'मध्ये फेरफार हाच खरा चिंतेचा विषय आहे, असे यावेळी शरद पवार म्हणाले. 'मी अनेक मतदारसंघांत फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. पण ईव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा 'ईव्हीएम'मध्ये गडबड केली जाऊ शकते, असे माझे मत असल्याचेही पवार पुढे म्हणाले. 


ईव्हीएम घोटाळा होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील २३ पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या पत्रकार परिषदेत दिली. 'सेव्ह द नेशन, सेव्ह डेमोक्रसी' या विषयावर चंद्राबाबू नायडू यांनी प्रेझेंटेशन केले.


दरम्यान, सत्ताधारी भाजप पक्षाकडून ईडी, आयकर विभाग, सीबीआय यांचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न मोदी सरकारतर्फे केला जात आहे. निवडणूक आयोग देखील याला अपवाद नाही,  असा आरोपही चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केला.


हॅकर सक्रिय? 


'ईव्हीएम'वर कुठूनही नियंत्रण ठेवले जाऊ शकते, असा दावा या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू यांनी केला. रशियन हॅकर करोडो रुपयांच्या बदल्यात ईव्हीएम हॅक करतात, असा दावाही नायडू यांनी केला. माझ्याकडे याबाबत पुरावे नसले तरी मोठी रक्कम मोजल्यास तुम्हाला हॅकरकडून विजयाची खात्री दिली जाते, अशी चर्चा आहे. याबाबतची माहितीही माझ्या कानावर आल्याचे नायडू म्हणालेत.


'ईव्हीएम' नकोच! 


ईव्हीएमचे ऑडिट करण्याची तसेच ईव्हीएमचा वापर झाल्यानंतर त्याच्यावर देखरेख ठेवणारी कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नाही. 'ईव्हीएम'चा वापर बंद करण्याची मागणी नायडू यांनी केली. गोवा, उत्तर प्रदेश आणि केरळमधून सदोष 'ईव्हीएम'बाबत तक्रारी पुढे आल्या असून लोकशाही वाचवण्यासाठीच आम्ही 'ईव्हीएम'बाबत जनजागृती करण्याचे ठरवले आहे, असेही नायडू म्हणाले.