मुंबई : ऑक्टोबर २०१८ मध्ये मुंबईच्या मालाड भागात मानसी दीक्षित या २० वर्षीय मॉडेलचा मृतदेह पोलिसांना एका सुटकेसमध्ये आढळला होता. या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय. फोटोग्राफर असलेल्या अवघ्या १९ वर्षीय सय्यद मुजम्मील इब्राहीम यानं मानसीची हत्या केली होती. पोलिसांना आरोपीला तत्काळ अटक करण्यात यश मिळालं होतं. आता या हत्येमागचं नेमकं कारण समोर आलंय. बांगूर पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्येही याचा उल्लेख करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारीरिक संबंध बनवण्यासाठी मनाई केल्यानं मानसी दीक्षित हिची हत्या केल्याचं आरोपीनं कबूल केलंय. सय्यद यानं आपण मानसीला काही दिवसांपासून ओळखत असल्याचं म्हटलं. मानसी त्याला आकर्षक वाटली. फोटोशूटचं कारण देत सय्यदनं मानसीला आपल्या घरी बोलावलं आणि तिच्यासमोर शारीरिक संबंध बनवण्याची मागणी ठेवली. परंतु, मानसीनं त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. 


आरोपी सय्यद मुजम्मील इब्राहीम (उजवीकडे)

हा नकार सहन न झाल्यानं सय्यद यानं मानसीच्या डोक्यावर लाकडी स्टूल मारला. बेशुद्ध झालेल्या मानसीवर बलात्काराचा प्रयत्नही आरोपीनं केला, असंही पोलिसांनी चार्जशीटमध्ये म्हटलंय. 


त्यानंतर आरोपीनं पीडितेचा रस्सीनं गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्यानं मानसीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून कॅबमधून मालाडमध्ये नेला. कॅब ड्रायव्हरनं दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं आपल्यासोबत आणलेली बॅग फुटपाथवर सोडून दिली आणि घाईघाईनंच तो एक रिक्षा घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेला. 


याबद्दल कॅब ड्रायव्हरनं पोलिसांना सूचना दिल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ओशिवरा अपार्टमेंटमधून सय्यद मुजम्मिल याला अटक करण्यात आली.