दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेते आणि आमदारांनी यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर लवकरच आणखी काही नेते आणि आमदार भाजपा, शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याने  विरोधी पक्षांसाठी आता एका मागोमाग एक मोठे धक्के बसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहीते-पाटील, विखे-पाटील यासारख्या राज्यातील दिग्गज राजकीय घराण्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर या दोन्ही पक्षांना जणू गळतीच लागली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभर मिळालेलं घवघवीत यश आणि विरोधी पक्षांचा झालेला दारुण पराभव यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि आमदार अस्वस्थ झाले होते. यातील काही अस्वस्थांनी यापूर्वीच भाजपा-शिवसेनेची वाट धरली आहे. तर आणखी काही जण त्याच वाटेवर आहेत.


- छगन भुजबळ आपला मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्यासह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे
- सातारचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे  भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे
- विधानपरिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फलटणचे रामराजे निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत, आपला जावई आमदार राहुल नार्वेकर आणि फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाणही त्यांच्याबरोबर भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. 
- निंबाळकर भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू असताना अचानक उदयनराजे देखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेने संभ्रम
- कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा महिन्या अखेरीस भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असल्याची माहिती 
- लोकसभा निवडणुकीत महाडिक यांच्याविरोधात आघाडीतील नेत्यांनी काम केल्यामुळे ते नाराज आहेत
- दुसरीकडे अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील घराणे देखील भाजपाच्या संपर्कात, पद्मसिंह  पाटील यांचा मुलगा आमदार राणाजगजितसिंह भाजपात जाण्याची जोरदार चर्चा, पुढील काही दिवसात याबाबत घडामोडी होण्याची शक्यता 
- याशिवाय आमदार राष्ट्रवादीचे दिलीप सोपल, बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार गुलाबराव देवकर, आमदार ज्योती कलानी हे नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात आहेत.
- काँग्रेसच्या आमदार  निर्मला  गावित आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार रश्मी बागल यांचा आज शिवसेनेत प्रवेश  होतोय. तर इतर नेत्यांच्या प्रवेशाचा मुहर्त लवकरच  ठरणार आहे
- मुख्यमंत्र्यांच्या सुरू होणाऱ्या महाजानदेश यात्रेत उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपाचे कमळ हाती घेण्याची शक्यता. 


काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काही आमदारांचे मतदारसंघ शिवसेनेकडे, तर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या काही आमदारांचे मतदारसंघ भाजपाकडे आहेत. त्यामुळे युतीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ होणार असल्याची चर्चा आहे. तर युतीतील 50 टक्के जागावाटपात या आमदारांना सामावून घेणं शक्य नसल्याने युती होणार नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.