मुंबई : पावसानं परतीची वाट धरली असं वाटत असतानाच मंगळवारी सायंकाळपासून Mumbai मुंबई, नवी मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काळ्या ढगांची चादर संपूर्ण शहरावर पसरल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर पावसानं शहराला चांगलच झोडपून काढलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळी सुरु झालेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळीसुद्धा कायम असल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं अनेक भागांमध्ये पाणी साचलं आणि रस्तेही जलमय झाले. दक्षिण मुंबईतील बहुतांश भागांमध्ये पाणी साचल्यामुळं अनेक अडचणी उदभवल्या असून, मुंबईकरांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दुकानांपासून अनेकांच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसानही झाल्याचं कळत आहे. 


वडाळा, माझगाव डॉक, भायखळा, दादर, हिंदमाता हे सारे भाग जलमय झाले आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळं अत्यावश्यक सेवांसाठी सुरु असणारी रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. कुर्ला, सायन, दादर या रेल्वे मार्गांवर पाणी साचल्यामुळं रेल्वे वाहतुकीवर याचे थेट परिणाम झाले आहेत. पश्चिम रेल्वेवर पावसामुळं फारसा खोळंबा झालेला नसला तरीही मध्य रेल्वेची वाहतूक या मुसळधार पावसामुळं कोलमडलं आहे. गोरेगाव, अंधेरी सबवे याशिवाय अनेक भागांमध्ये पणी साचल्यामुळं बहुतांश मार्गांवरी रस्ते वाहतुकही वळवण्यात आली आहे. त्यामुळं नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. 





 


वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारीसुद्धा पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळं बुधवारचा दिवसही मुंबई शहर, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरवासियांना पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे हे चित्र स्पष्ट होत आहे.