माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
आज दुहेरी योग....
मुंबई : माघी गणेश जयंतीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून लगबग सुरु असतानाच हा दिवस उजाडला आणि सर्वत्र या दिवसाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मंगळवारच्याच दिवशी गणेश जयंतीचा योग आल्यामुळे याबाबत भाविकांमध्येही विशेष आनंद पाहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून अनेकांनी पहाटेपासूनच मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराची वाट धरली.
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसर भाविकांनी गजबजल्याचं पाहायला मिळत आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने मंदिराला सुरेख अशी रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच आजच्या दिवशी होणारी गर्दी पाहता भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर न्यासाकडून काही विशेष गोष्टींची काळजी घेण्यात येत असल्याचं कळत आहे.
आजच्या दिवशी लाखोंच्या संख्येने विविध ठिकाणहून भाविक सिद्धिविनायकाच्या दिशेने येत आपली श्रद्धासुमनं गणरायाचरणी अर्पण करणार आहेत. शिवाय या दिवसाचं औचित्य साधत अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्री गणेश जयंती’ म्हणून ओळखली जाते. अनेक ठिकाणी हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जाण्याची परंपरा आहे. तर, माघी गणेशोत्सवात अनेक ठिकाणी गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखली जाते.