मुंबई : सकल मराठा समाजातर्फे 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पण या बंदमध्ये मुंबईचा ही समावेश असल्याचं आता बोललं जातंय. फक्त नवी मुंबईमध्ये बंद नसणार आहे. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण लागलं होतं. त्यात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे नवी मुंबई परिसरात शांतता टिकून राहावी यासाठी नवी मुंबईमध्ये बंद नसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या राज्यव्यापी बंदबाबत मराठा क्रांती मोर्चाने निवेदन दिलं आहे. मुंबईतही बंद होणार आहे पण तो शांततामय मार्गाने होणार असल्याचं म्हटलं आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत हा बंद पुकारण्यात आला आहे. हिंसा न करण्याचं आवाहन सकल मराठा मोर्चाकडून करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा आणि शाळा, कॉलेज यांना बंदमधून वगळण्यात आलं आहे. 


आत्महत्या करू नये, त्याने प्रश्न सुटणार नाही असं देखील संघटनेनं आवाहन केलं आहे. मराठा समाजाची औरंगाबाद येथे राज्यव्यापी बंद संदर्भात बैठक पार पडली. त्यानुसार महाराष्ट्रासह आता मुंबईतही बंद पुकारण्यात आला आहे. शांततेन हा बंद पुकारण्यात येईल. हा बंद कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही तर न्याय हक्कासाठी आहे. सगळ्या समाजाच्या लोकांनी सहकार्य करावं असं देखील आवाहन करण्यात आलं आहे.


यासोबतच कुठल्याही शासकीय, खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलिसांना सहकार्य करण्यात यावं असं देखील आवाहन यावेळी करण्यात आलं आहे.