जाणून घ्या मराठा क्रांती मोर्चाच्या `वॉर रूम` बद्दल
मराठा क्रांती मोर्चाला सकाळपासून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. लाखोंच्या संख्येत मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाला सकाळपासून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. लाखोंच्या संख्येत मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.
मुंबईसह राज्यभरातून तरूण आणि इतर बांधव उपस्थित होते. हा मोर्चा ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित केला. मात्र त्याची सुरूवात गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. या मराठा मोर्चाचे नियंत्रण कक्ष दादर येथील शिवाजी मंदिर येथे आहे. या वॉर रूममध्ये तंत्रज्ञान, आयटी क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या मराठा तरुणांचा सहभाग आहे.
मुंबईत होणाऱ्या या मोर्चामध्ये ज्यांना नियोजनाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे अशा स्वयंसेवकाची नोंदणी करण्याचे काम येथे सुरू होते. आधार कार्डच्या प्रतीसह ही नोंदणी करण्यासाठी सकाळपासून गर्दी उसळली होती. त्यात मुली आणि स्त्रियांचाही सहभाग मोठा होता. विदर्भ, जालना, सांगली सातारा, पुणे, अहमदनगर, बुलढाणा या ठिकाणांहून आलेल्या समन्वय समितीमधील सदस्य या वॉर रूमध्ये एकवटले होते.
‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणासह ‘एकदा लढलो मातीसाठी, आता लढू जातीसाठी’ अशा दमदार घोषणा व्हायरल करीत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्या मागे या वॉररूमचा हात आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी बॅनर, घोषणांचे बॅनर, मार्ग क्रमण सुचविणारे यासारखे अनेक बॅनर याच नियंत्रण कक्षेद्वारे लावण्यात आले आहेत. मराठा क्रांती मोर्चासाठी हजारो लोक मुंबईत दाखल झाले आहेत.