मराठा आरक्षण: विधनपरिषदेत खडाजंगी; राजदंड पळविण्याचा प्रयत्न
मराठा मोर्चा: चर्चा नको आरक्षण द्या - धनंजय मुंडे यांची मागणी
मुंबई : मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत आज (बुधवारी) जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. आमनेसामने आलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांमुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. विधिमंडळ परिसरातूनच सुरू झालेल्या या संघर्षाचे पडसाद सभागृहातही उमटले. या संघर्षाची परिणीती राजदंड पळविण्याच्या प्रयत्नात झाली. या गदारोळामुळे सदनाचे सभापती रामराजे निंबाळकर यांना सभागृहाचे कामकाज 30 मिनीटे तहकूब करावे लागले.
दरम्यान, सभापतीच्या आसनासमोरच्या रिकाम्या जागेत सर्वपक्षी आमदारांनी धाव घेतली. या वेळी हे आमदार मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा घोषणा देत होते. दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. स्तगन प्रस्तावावर बोलताना, ‘हे सरकार आल्यापासून मराठा समाज आरक्षण या विषयावर अनेकदा चर्चा झाली. चर्चा झाली मात्र आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे आता यापूढे चर्चा नको आरक्षण द्या’, अशी मागणी मुंडे यांनी सरकारकडे केली. या वेळी मुंडे यांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात यावे अशीही भूमिका मांडली. या मागणीलाही आमदारांनी पाठिंबा देत सभापतींच्या आसनासमोरील रिकाम्या जागेत धाव घेतली.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सत्ताधारी भाजप शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘सत्ताधारी शिवसेना-भाजप सरकारला मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही’, असा आरोप विखे पाटील यांनी केला. ‘भाजपाची भूमिका शेतकरी आणि आरक्षण विरोधी आहे’, असा आरोप करतानाच, ‘हवामानाप्रमाणे शिवसेनेची धोरणे बदलत असतात’, असा टोलाही विखे पाटील यांनी शिवसेनेला लगावला.