मुंबई : ९ ऑगस्टला मुंबईत होणारा मराठा मोर्चा हा परवानगीच्या प्रक्रियेत आहे. मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केलं . तसंच ड्रोन वापरासाठी अर्ज आला नसल्यानं त्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस मराठा मोर्चासाठी मोठा बंदोबस्त तैनात करणार आहे.


मराठा समाजातर्फे मराठा समाजासाठी आरक्षणासहित विविध प्रलंबित मागण्यासांठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा मूक क्रांती मोर्चे काढण्यात आले. याच मालिकेतील शेवटचा महामोर्चा मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर हरियाणा आणि गुजरात राज्यातूनही मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती मोर्चाच्या संयोजकांनी दिली होती.