मुंबई : आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज हे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. 


सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या मोर्चात नेत्यांनी सहभागी होण्याची देखील शक्यता आहे. पण मोर्चाला राजकारणापासून आयोजकांनी लांबच ठेवलं आहे. महिला आणि तरुणींनी मोर्चाचे नेतृत्व केलं. आझाद मैदानात मराठा समाजाच्या रणसागिणींनी एल्गार केला आणि सरकारला इशारा देखील देऊन टाकला. आरक्षण न दिल्यास सत्तेतून खाली आणण्याची ताकद देखील मराठा समाजात असल्याचा इशारा यावेळी या रणरागिणींनी सरकारला दिला.