मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणासठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलन व्यापक स्वरूप धारण करत असतानाच आंदोलनालाला हिंसक वळणही प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीपासून ते राजकीय आणि सरकारी आणि सामाजिक पातळीवर विविध घडामोडी घडत आहेत. त्यापैकी गेल्या २४ तासांतील काही ठळक घडामोडींचा घेतलेला हा वेध..


जीवनवाहिनी एसटीला मोठा फटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.ला बसला आहे. २० ते २९ जुलै या कालावधीत तब्बल ३५३ एसटी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलीये. त्यापैकी सर्वाधिक १३६ बसेस एकट्या सोलापूर जिल्ह्यात फोडण्यात आल्यात. जाळपोळ आणि तोडफोडीमुळे एसटीचे १ कोटी ४५ लाख इतकं नुकसान झालंय. तर आंदोलनामुळे रद्द कराव्या लागलेल्या फेऱ्यांमुळे २२ कोटी २ लाख रुपयांचा महसूल बुडालाय. 


चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; बससेवा ठप्प


पुणे: चाकणमध्ये आज (मंगळवार, ३१ जुलै) सकाळी तणावपूर्ण शांतता आहे. चाकणमध्ये जाणारी एसटी सेवा बंद आहे. सकाळपासून पीएमपीएमएलची बससेवाही ठप्प आहे. काल (सोमवार, ३० जुलै) चाकणमध्ये १२ ते १५ बसेस फोडण्यात आल्या. चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलीय. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलंय.


पोलिसही जखमी


राजगुरूनगर आणि चाकणला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्टॉपवर मोठी गर्दी झालीय. दरम्यान काल झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या चाकणचे पोलीस निरीक्षक चौधरींचा कार्यभार आता तळेगावचे पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आलाय. पोलीस कॉन्स्टेबल अजय भापकर गंभीर जखमी आहेत. पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगुळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे देखील कालच्या हिंसाचारात जखमी आहेत. 


काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणखी आक्रमक झालीये. पक्षाचे सर्व आमदार सामूहिकराजीनाम्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या 30 जुलैला विधानभवनात झालेल्या बैठकीत आमदारांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली.  हायकमांडनं परवानगी दिल्यास काँग्रेसचे सर्व आमदार मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर राजीनामे देणार आहेत. 


धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक


राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झालाय. पुढील धोरण ठरवण्यासाठी 5 ऑगस्टला पुण्यात कृती समितीची बैठक आयोजित केलीय. यामध्ये धनगर समाजातले सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल.