दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मराठा आरक्षणाबाबत निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. या निर्णयाला आव्हान देणार असल्याची माहिती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. हा अंतरिम आदेश आहे. हा विषय अंतिम निर्णयासाठी घटनापीठाकडे गेला आहे. त्यामुळे आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही. अंतरिम आदेश दिलाय त्यात यापूर्वीच्या आरक्षणाला धक्का नाही. यंदाच्या नोकर्‍या आणि शैक्षणिक प्रवेशात आरक्षण नसेल. हा अधिकार घटनापीठाकडे आहे, असे चव्हाण म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षणाबाबतीत कोणताही आदेश नाही, इतर आरक्षणाच्या खटल्यात असे आदेश नाहीत. पण मराठा आरक्षणासाठी दिलेला आदेश हा धक्कादायक आहे. सोमवारी मुख्य न्यायमूर्तींकडे याबाबत अर्ज करणार आहोत. उद्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक बोलवली आहे, कायदेतज्ज्ञांना बोलवलं जाईल. मुख्य न्यायमूर्तींकडे हा आदेश रद्द करावा यासाठी आव्हान देणार आहोत, असे ते म्हणालेत.


 सकल मराठा समाजाचा सूचनाही घेण्यात आल्या, त्या कायदेतज्ज्ञांपर्यंत देण्यात आल्या होत्या. आता जे सुरू आहे ते राजकारण सुरू आहे. हा विषय राजकारणाचा नाही, मराठा समाजाचा विषय आहे. प्रत्येक टप्प्यात काही लोक टीका करत होते. आजचा निर्णय अंतिम नाही. घटनापीठाकडे अंतिम निर्णय होईल. अगोदरच्या निर्णयासाठी आधीच्या सरकारने क्रेडीट घेण्याचे कारण नाही, ते एवढे गंभीर होते तर यात केंद्र सरकारने हस्तक्षेप याचिका दाखल का केली नाही, असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना विचारला.


वकील खटला लढवत आहेत. मागच्या सरकारने जे वकील लावले होते तेच आम्ही लावले होते, त्यात आणखी चांगले वकील दिलेले आहेत. केंद्र सरकारने दिलेले आरक्षण, इतर राज्यांनी दिलेल्या आरक्षणाला अंतरिम स्थगित दिलेली नसताना मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती धक्कादायक, अनाकलनीय आणि अनपेक्षित, असे अशोक चव्हाण म्हणालेत.