मुंबई : आझाद मैदानावरील मराठा क्रांती ठोक मोर्चाचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील मराठा क्रांती मोर्चाने उपोषण मागे घेतले आहे. तशी घोषणाच मराठा मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे. तसेच मराठा मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू होतं. आपण मराठा आंदोलकांचं अभिनंदन करण्यासाठी आलो असून त्यांच्या संघर्षाचा हा विजय असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलंय. मराठा आंदोलकांच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी सांगितले.


मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चेशिवाय एकमतानं विधेयक मंजूर करण्यात आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर छोट्या विरोधी पक्षांनीही या आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा दर्शवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आधी विधानसभेत हे विधेयक मांडलं. हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं.


विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधकांचे आभार मानले. त्यानंतर हे विधेयक विधानपरिषदेत मांडण्यात आलं. भाजप आमदारांनी मात्र विधेयक मांडण्यापूर्वीच विधानभवनाच्या परिसरात जल्लोष केला. भगवे फेटे बांधून पेढेही वाटले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधेयक मांडण्यासाठी विधानसभेत प्रवेश केला.