मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांना सभागृहात खुर्चीवर नाही तर व्यासपीठावर बसवण्यात यावं यावरुन बैठकीत गोंधळ झाला. संभाजीराजे यांना व्यासपीठावर बसवण्यात यावं अशी मराठा मोर्चा समन्वयकांची मागणी होती. त्यावरुन बैठकीच्या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीराजेंना तिसर्‍या रांगेत बसवल्याचा आक्षेप घेतल्यानंतर विजय वड्डेटीवार आणि अजित पवार व्यासपीठावरून खाली आले. संभाजीराजे तुम्ही व्यासपीठावर बसा आम्ही खाली बसतो अशी विनंती या दोघांनी केली. कारण व्यासपीठावर कोरोनामुळे तीनच खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. 


सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत हा गोंधळ झाला. छत्रपती संभाजीराजे भोसले यांना व्यासपीठावर स्थान न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी थेट मंत्र्यांनाच खडे बोल सुनावले.


महाविकास आघाडी सरकारनं 'सारथी' संस्थेकडं दुर्लक्ष केलं असून मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी ही संस्था बंद करण्याचा डाव आहे, असा आरोप मराठा संघटनांनी केला होता. 


आजची पहिली बैठक ही सर्व प्रतिनिधींसोबत होणार होती. अजित पवार, विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, विनायक मेटे, विनोद पाटील व मराठा क्रांती मोर्चाचे विरेंद्र पवार हे देखील बैठकीला उपस्थित होते. मात्र आसन व्यवस्थेवरून गोंधळ झाला. व्यासपीठावर अजित पवार, विजय वडेट्टीवार आणि नवाब मलिक हे बसले होते. तर, संभाजीराजे हे तिसऱ्या रांगेत बसले होते.