अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Asawari Joshi join NCP : अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
मुंबई : Asawari Joshi join NCP : अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात असावरी जोशी यांचा प्रवेश सोहळा पार पडला.
अभिनय क्षेत्रात त्यांचे नाव घेतले जाते. त्या अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून झळकल्या असून त्यांचा चेहरा घराघरात पोहोचला आहे. याचा लाभ राष्ट्रवादीला होईल, असे म्हटले जात आहे. यापूर्वी अनेक कलकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सविता माल्पेकर, प्रिया बेर्डे, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, गायिका वैशाली माडे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना सुरेखा कुडची आदींचा समावेश आहे.
आसावरी यांचा जन्म 6 मे, 1965 रोजी मुंबईत झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. रंगभूमीवर काम करत असताना त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी आली. पुढे ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘एक रात्र मंतरलेली’, ‘गोडी गुलाबी’, ‘बाल ब्रम्हचारी’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
आसावरी यांनी अनेक जाहिराती, मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘ऑफिस ऑफिस’ या हिंदी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती. ‘ओम शांती ओम’ या हिंदी चित्रपटात त्यांनी लव्हली कपूरची भूमिका साकारली होती. ‘स्वाभिवान: शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत त्यांनी प्रोफेसर अदिती सूर्यवंशीची भूमिका साकारली.