धारावी झोपडपट्टीतील सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे मरकज कनेक्शन
धारावी झोपडपट्टी आतापर्यंत सापडलेल्या सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे केसेसचे मरकज कनेक्शन असल्याचं समोर आले आहे.
मुंबई : धारावी झोपडपट्टी आतापर्यंत सापडलेल्या सर्व १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे केसेसचे मरकज कनेक्शन असल्याचं समोर आले आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं याबाबत माहिती दिली आहे. धारावीत सापडलेले सर्व रूग्ण हे सर्व दिल्ली निझामुद्दीनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. धारावीतील सर्व कोरोनाबाधित हे एकाच मशिदीत जात होते. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली.दरम्यान, मरकजहून आलेल्या या व्यक्तीनंतर केरळला रवाना झाल्या.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोनाच्या तपासणीची क्षमता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संशयित आणि बाधितांची संख्या जलदगतीनं समोर येत आहे. तसंच कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
सोबतच लक्षणं न दाखवणाऱ्या मात्र पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांच्याही तपासण्या केल्या जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त केसेस वरळीच्या एका पॉकेट एरियातच आढळून आल्या आहेत. तर वोकहार्ट हॉस्पिटलमधील मोठ्या संख्येतला कर्मचारी वर्ग कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. मुंबई महापालिका हद्दीतली लोकसंख्या १ कोटी २० लाख इतकी आहे. त्यामुळे या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. म्हणून जास्त घनता असलेल्या क्षेत्राकडे मुंबई महानगरपालिका विशेष लक्ष देत आहे.
दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रातल्या १०६ केसेसपैकी ५१ केसेस या जी दक्षिण विभागातील आहेत. त्यातील ९९ टक्के केसेस हायरिस्क काँटॅक्टमधील आहेत. त्यांना पालिका प्रशासनानं यापूर्वीच क्वारंटाइन केलं असून त्यांच्या तपासण्याही सुरु केल्या आहेत.