मुंबईत रहिवासी सोसायटीत माकडांंचा हैदोस
मुंबई : अंधेरी मरोळ येथील ईको एलिगन्स सोसायटीतील रहिवासी सध्या एका पाहूण्याच्या वास्तव्याने चांगलेच त्रस्त आहेत. हे पाहूणे कधीही कोणाच्या घरी घुसतील याचा काही नेम नाही. गेल्या काही महीन्यांपासून या इमारतीत वास्तव्याला असलेली ही दोन माकडे दिवस रात्र अक्षरशः हैदोस घालत आहेत.
भूक लागली की हव त्याच्या घरी घुसायच आणि मग हव ते खायच. खाऊन झाल की सोसायटीत मिळेल त्याच्या घरी, कोणाच्या बाल्कनीत आराम करायचा असा यांचा दिनक्रम असतो. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा त्रास सहन करणार्या रहिवाश्यांनी अग्निशमन दलाला याची तक्रार देखील करून झाली मात्र त्याची कोणतीच दखल अद्याप घेण्यात आलेली नाही.
वन विभागात तक्रार केली असता आमच्याकडे दोनच पिंजरे असून प्रशिक्षित कर्माचारी नसल्याच त्यांच म्हणण आहे. बर्याच वर्षांपासून रहिवाशी या इमारतीत राहत आहेत. मात्र अशी माकडं येऊन रहाणं सगळ्यांसाठीच नवीन आहे. रहिवाश्यांनी या माकडांचा एवढा धसका घेतलाय की लहान मुलांनी खाली खेळणं बंद केल आहे तर घराच्या खिडक्या उघडताना देखील रहिवाश्यांना भीती वाटत आहे. अग्निशमन विभाग आणि वन खात्याने लवकरात यात लक्ष घालण्याची मागणी रहिवाश्यांनी केली आहे.