राज्यात पुन्हा मास्कसक्ती? पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांचे संकेत
मास्कबाबत आज मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत होणार मोठा निर्णय?
मुंबई : देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मोठे संकेत दिले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक होऊ शकतं, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. आज मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत मास्कसक्तीबाबत निर्णय घेणार असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत मास्क पुन्हा अनिवार्य करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मास्क सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात येऊ शकतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलीय.
राज्यात रोज 25 हजारापर्यंत टेस्टिंग केल्या आत असून टेस्टिंग आणखी वाढवण्यात येणार आहेत. आपलं राज्य सेफ झोनमध्ये आहे, राज्यात सध्या 929 अॅक्टिव्ह केसेस आहेत. पॉझिटिव्ह केसेसचं जिनोम सिक्वेसिंग करण्यात येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
6 ते 12 वयोगटासाठी लसीकरण
6 ते 12 वयोगटासाठी लसीकरण (Vaccination) करण्याची परवानगी देण्यात आली आहे, नियमावली आली की तातडीने लसीकरण सुरु होईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच 12 ते 15 आणि 15 ते 17 वयोगटातील लसीकरण वाढवण्यावरही भर दिला जात असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.