मुंबईत कडक निर्बंध लागू होण्याचे महापौरांचे संकेत, लोकलबाबत लवकरच निर्णय
स्टेशनच्या बाहेर असलेल्या दुकानांवर जाऊन मास्क न घालणाऱ्यांना महापौरांनी ताकीद दिली.
मुंबई : वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. 1 फेब्रुवारीपासून मुंबईत सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी दिल्यानंतर गर्दी वाढली अन् त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येते आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेला पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
जानेवारी महिन्यात दररोज 300 ते 350 रुग्ण आढळत होते. मात्र आता दररोज सरासरी 600 ते 650 रुग्ण आढळून येतायत. त्यामुळे 22 फेब्रुवारीला आढावा घेऊन रुग्णसंख्येतील वाढ मोठी असल्यास लोकलबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौरांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जनजागृतीसाठी स्वत: मैदानात उतरल्यायत. रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये फिरून महापौरांनी पाहणी केली. तर दुसरीकडे सांताक्रूजमधल्या हॉटेल्सवरही महापौरांनी छापा घातला. साई सन हॉटेलमध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांचं भाडं घेऊन लगेचच सोडून देण्यात आल्याचं समोर आलं. स्टेशनच्या बाहेर असलेल्या दुकानांवर जाऊन मास्क न घालणाऱ्यांना महापौरांनी ताकीद दिली.