मुंबई: प्रसारमाध्यमांमुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी झाल्याचे विधान राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तावडेंनी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी कोणाला राजकारणात यायचे आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी मोजक्या विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता इतरांनी फारसा रस दाखवला नाही. तेव्हा तावडेंनी प्रसारमाध्यमांनी राजकारणाला बदनाम केल्याचे म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तावडेंच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असे वक्तव्य करणे हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. त्यांनी सर्व माध्यमांची जाहीर माफी मागावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार एसएम देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे यावरुन आता भाजपला नव्या वादाला तोंड द्यावे लागणार आहे. 


आमदार राम कदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप अगोदरच अडचणीत सापडला आहे. त्यामध्ये आता विनोद तावडेंच्या वक्तव्याची भर पडली आहे. भाजपने गुरुवारीच राम कदम यांना पक्षाचे प्रवक्ते म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यास निर्बंध घातले होते. राम कदम यांनी माफी मागितली, आता विषय संपला असे सांगत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.